७५ वर्षांतील सर्वात अपयशी पंतप्रधान मोदींचा असत्याचा विलाप !
७५ वर्षांतील सर्वात अपयशी पंतप्रधान मोदींचा असत्याचा विलाप !
देशात सर्वात जास्त मजुर पाठवलेल्या गुजरातमुळे कोरोना पसरला नाही का?
मुंबई, दि. १० फेब्रुवारी:
नरेंद्र मोदी हे भारताचे ७५ वर्षांतील सगळ्यात अपयशी व कर्तृत्वशून्य सरकारचे पंतप्रधान आहेत. आठ वर्षांच्या कारकिर्दीत बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, ८४% लोकांचे घटलेले उत्पन्न, चीनचे संकट आदी मुदद्यांवर त्यांच्याकडे उत्तर नसल्याने ते अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा आटापिटा करत आहेत. मागील ३ दिवसांपासून त्यांचा असत्याचा विलाप सुरु असल्याचे अख्खा देश पाहतो आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडत त्यांचे सर्व दावे खोडून काढत सावंत म्हणाले की, राज्यांनी लॉकडाऊन केला म्हणून करावा लागला असे नरेंद्र मोदी म्हणतात परंतु मोदींनी कोणत्याही मंत्रालयाशी चर्चा न करता लॉकडाऊन जाहीर केला हे माहितीच्या अधिकारातून (RTI) समोर आले आहे. जर राज्यांमुळे लॉकडाऊन केला होता तर २१ दिवसांत कोरोनावर मात करु हे मोदी का म्हणाले ? त्यानंतर लॉकडाऊन कालावधी अनेकदा का वाढविला? टाळ्या, थाळ्या व घंटा का वाजवायला लावल्या?
महाराष्ट्र काँग्रेसमुळे व मुंबईतील उत्तर भारतीय स्थलांतरित मजूरांमुळे कोरोना पसरला हा मोदींचा असत्याचा कांगावा आहे. कारण मोदींनी २४ मार्च २०२० रोजी अचानक लॉकडाऊन जाहीर केला. रात्री ८ वाजताच्या भाषणाबरोबर मोदींनी ४ तासाची मुदत देत देशात लॉकडाऊन लावला ते अधिक भितीदायक होते. २१ दिवसांत कोरोनावर मात करु म्हटल्याची मुदत १४ एप्रिलला संपली पण कोरोना मात करु शकले नाहीत.
महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनने मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवल्याने कोरोना पसरला हा त्यांचा दावाही तेवढाच हास्यास्पद व खोटा आहे. पहिली श्रमिक ट्रेन १ मे रोजी सुरू झाली. म्हणजे ३८ दिवसांनंतर ! गुजरातमधून १०२७ ट्रेन निघाल्या व १५ लाख स्थलांतरित मजूर त्यांच्या त्यांच्या घरी परत पाठवले तर दुसरीकडे महाराष्ट्रातून ८४४ ट्रेनमधून १२ लाख मजूर त्यांच्या घरी परतले. गुजरातमधून देशातील सर्वात जास्त ट्रेन सोडल्या व सर्वात जास्त मजूर घरी गेले मग कोरोना गुजरातमधून जास्त पसरला पाहिजे होता, महाराष्ट्रातूनच कसा पसरला? आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मजूरांना थांबवले पाहिजे होते असे भाजपा म्हणत असेल तर मोदींनी गुजरातमधील मजूरांना का नाही थांबवले? अशी प्रश्नांची सरबत्ती करत सावंत यांनी मोदींच्या बोलण्यातील खोटेपणा उघड केला.
देशात गेल्या ३ वर्षांत बेरोजगारीमुळे ९१४९ तर कर्जबाजारीपणा मुळे १६०९१ असे मिळून २५००० लोकांनी आत्महत्या केल्या. ४.६ कोटी लोक प्रचंड गरीब झाले. ८४% लोकांचे उत्पन्न घटले. गेल्या ४७ वर्षांतील सगळ्यात जास्त बेरोजगारी याला मोदी सरकार जबाबदार असताना लोकांचे लक्ष मोदी सरकारच्या घोर अपयशाकडून दुसरीकडे वळविण्यासाठी आज मोदींकडून काँग्रेस व नेहरूंचा जप चालू आहे असे सावंत म्हणाले.
