हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी, धार्मिक तेढ निर्माण करु नका
हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी, धार्मिक तेढ निर्माण करु नका..
मुंबई, दि. १० फेब्रुवारी
कोणत्याही देशात, राज्यात, शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, कधीकधी दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आज जग पुढे जात आहे, प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी आहे. अशावेळी या तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल, याचा विचार केला गेला पाहिजे. एखादी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जाते मग त्यावरुन कुणी ट्विट करते लगेच त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून नको त्या विषयाला महत्त्व दिले जाते. सर्वांनीच समजंस भूमिका मांडून संयम ठेवला पाहिजे.
