सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ
सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ..
पुणे, दि.५ फेब्रुवारी :
शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.
नवीन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आणखी काही काळ दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.पुणे ग्रामीण आणि पिंपरी -चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढवावे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या गंभीर रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णालयांना व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी कोवॅक्सिन लसमात्राचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. कोवॅक्सिन लशीचा पुरवठा होण्याबाबत केंद्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
डॉ. निलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठांना ग्रामीण भागात वर्धक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यास अडचण येत असल्याने शिबिराच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे सूचवले.
बैठकीत सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर २६.६० टक्के होता आणि ७ दिवसात ४५ हजार ७८८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यापेक्षा हे प्रमाण ४४.७५ टक्क्यांनी कमी आहे. मागील आठवड्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३७ टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात एकूण १ कोटी ६२ लाख ६७ हजार लसीकरण झाले आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ३२ टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे अशी माहिती दिली.
