दादांच्या आपुलकीच्या चौकशीने उपमुख्यमंत्री कार्यालयाचे चोपदार झाले कृतार्थ !

0
IMG-20220203-WA0024

दादांच्या आपुलकीच्या चौकशीने उपमुख्यमंत्री कार्यालयाचे चोपदार झाले कृतार्थ !

मुंबई, दि. 4 फेब्रुवारी:
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी, करड्या शिस्तीसाठी, वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिध्द आहेत. करड्या शिस्तीच्या, कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या अजितदादांचं अनोखं रुप मंत्रालयातील उपस्थितांनी अनुभवलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अजितदादांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदारांच्या मुलगी आणि जावयाची इच्छा पूर्ण केली.

त्याचं झालं असं की, उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार पदावर कार्यरत आहेत. येत्या काही दिवसात ते सेवानिवृत्त होत आहेत. विलास मोरे यांच्या मुलीची आणि जावयाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ही इच्छा ते वारंवार मोरे यांच्याकडं व्यक्त करत होते.
पण लेकीची व जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची चोपदार विलास मोरे यांची हिंमत होत नव्हती. चोपदारांनी परवा हिंमत करुन त्यांच्या मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचं आहे, असं अजितदादांना सांगितलं. त्यावर अजितदादांनी तात्काळ होकार दिला. वेळापत्रक व्यस्त असूनही दुसऱ्या दिवशीच भेटायला बोलवलं.

दादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी अजितदादांची भेट घेतली. अजितदादांनी सुध्दा आपुलकी, जिव्हाळ्यानं त्यांच्याशी संवाद साधला. वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. मुलगी व जावयाच्या कर्तबगारीबद्दल अजितदादांनी चोपदार विलास मोरे यांचंही कौतुक केलं. अजितदादांनी केलेलं कौतुक तसंच लेकीचा, जावयाचा हट्ट अजितदादांनी पुरवल्यामुळं सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते, तर त्यांची लेक आणि जावई अजितदादांच्या अपुलकीमुळं अक्षरश: भारावून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *