निवृत्त अधिकाऱ्याचा इतका मोह कशाला?

0
ncp

निवृत्त अधिकाऱ्याचा इतका मोह कशाला?

मुंबई, दि. ३ फेब्रुवारी:

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवृत्त अधिकाऱ्याला खाजगी सचिवपदी नियुक्त केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत सर्वच विषयांवर कायदेशीर सल्ला घेणारे राज्यपाल निवृत्त अधिकाऱ्याला खाजगी सचिवपदी नेमणूक करण्यावरही कायदेशीर सल्ला घेतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, निवृत्त अधिकार्‍याला जे नियमितपद आहे त्याच्यावर नियुक्त करता येत नाही. मात्र राजभवनातून तसे आदेश निर्गमित झाले आहेत. हजारोंच्या संख्येने सनदी अधिकारी या राज्यात काम करतात. त्यातील एखादा अधिकारी निवडण्याचा अधिकार राजभवनाला आहे. निवृत्त अधिकाऱ्याला त्या पदावर नियुक्त करणे हे अनियमित कामकाज आहे. हा नियमांचा भंग आहे. राजभवनातून नियमांचा भंग होणे हे अपेक्षित नाही.

राजभवनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही ही जबाबदारी असते किंवा त्यांनी नियमभंग होणार नाही याची खात्री केली पाहिजे. मात्र एखादा अधिकारी निवृत्त झाला तरी त्याच्यासाठी इतका मोह कशाला? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

जसे कायदेशीर सल्ले राज्यपाल घेतात त्याप्रमाणे याविषयी सल्ला घेतील व त्या निवृत्त अधिकाऱ्याला रिलीफ करतील अशी अपेक्षाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *