दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच:

0
exam 10

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच:

मुंबई, दि. ३ फेब्रवारी:

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन यावर निर्णय झाला असून महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आणि ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळेतच घेतली जाणार असून यावेळी परिक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात येणार आहे, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे.

दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल.

परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होईल. त्याआधी दहा मिनिटे म्हणजे १०.२० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.

परिक्षेसाठी लसीकरणाचे बंधन नसले तरी विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पुरेसा अवधी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी लसीकरण पूर्ण करावे. आतापर्यंत राज्यभरात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण आहे. एका शाळेत १५ पेक्षा जास्त परिक्षार्थी असतील तर तिथे परीक्षा केंद्र केली जाईल तर परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्यात येणार

कोरोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्याक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. शाळा तिथे परीक्षा केंद्र असून शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील.

परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. करोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *