पवारसाहेब, तुम्हीच वाईन व दारूतला फरक समजून सांगा !

0
BJP dd

पवारसाहेब, तुम्हीच वाईन व दारूतला फरक समजून सांगा !

मुंबई, दि. २ फेब्रुवारी :

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विषयाची चर्चा अजून थांबलेली नाही. भाजपाने आज पुन्हा वाईनवर संताप व्यक्त केला. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे शरद पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल असा टोला मारत वाईन आणि दारूमधील फरक आपणास समजत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, वाईन म्हणजे दारू नाही असे सांगणे हा तमाशा काय चालला आहे हे कळत नाही. छाप्यात गांजा सापडला की त्याला हर्बल तंबाखू म्हणायचे तसेच वाईन म्हणजे दारू नव्हे असे समर्थन चालू आहे. वाईन ही दारू नसेल तर दारुच्या दुकानावर वाईन शॉप असा बोर्ड लाऊ नका. त्याच्या जागी अमृत शॉप, नीरा शॉप असे काहीही म्हणा.

वाईनचा निर्णय हा मुठभर लोकांचे भले करण्यासाठी घेतला आहे पण हा निर्णय शेतकऱ्याच्या भल्यासाठी घेतल्याचे दाखविले जात आहे. शेतकऱ्यांचे भले करणार असाल तर गेल्या दोन वर्षात राज्यात शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी काय केले ते सांगा. अजूनही अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीसाठीची नुकसान भरपाई पोहोचलेली नाही, शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण नाही, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळालेले नाही.

किराणा मालाच्या दुकानात वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयामुळे जनतेत संताप आहे. विशेषतः ग्रामीण भागात महिलांमध्ये या निर्णयाला तीव्र विरोध आहे. गावोगावच्या महिला आता रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करतील त्यावेळी शरद पवारांना खरे दुःख होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *