लातूर जिल्ह्यात पाच हजार एकरवर बांबू लागवड करणार
लातूर जिल्ह्यात पाच हजार एकरवर बांबू लागवड करणार..
लातूर, दि. 2 फेब्रुवारी:
लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला गती देवू शकेल अशा बांबूची या वर्षात पाच हजार एकरवर लागवड करणार असून येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू पासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली.
लोदगा येथील देशातल्या पहिल्या बांबू टिशू कल्चर तयार करणाऱ्या अलमॅक बायोटेक लॅबच्या दुसऱ्या टप्याच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या कृषीचं भविष्य बदलवू शकणारा बांबूचा पथदर्शी प्रकल्प लातूर जिल्ह्यातून होत असल्याचा आनंद व्यक्त करून येत्या काळात शेतकरी फक्त “अन्नदाता नव्हे तर ऊर्जा दाता” बनणार असल्याच्या देशाचे रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाक्याचा अर्थ येत्या काळात सत्यात उतरू शकतो त्यामुळे लातूर जिल्ह्यात या वर्षी पाच हजार एकरवर बांबू लागवड करुन नजिकच्या काळात सहकार तत्वावर देशातली पाहिली रिफायनरी लातूरला उभा करु अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.
भारताच्या ईशान्य भागात आसाम मध्ये नुमालीगड येथे सर्वात मोठी बांबू इथेनॉल रिफायनरी उभी राहत आहे. ती रिफायनरी आपल्यासाठी मोठी आशादायी ठरेल असे सांगून लातूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्या काळी सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग उभं करण्यासाठी चालना दिली. आज सोयाबीन हब म्हणून लातूर जिल्हा देशभरात ओळखला जात असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
जगभरातील सोयाबीनचे भाव लातूरमध्ये ठरतात हे अभिमानाची बाब असून ही सगळी किमया लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. येत्या काळात जिल्ह्यात कृषीमध्ये क्रांतीकारक बदल घडून येतील हे ओळखून आपण लातूर विमानतळ ” एअर कार्गो, ड्राय इन लँड ” पोर्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे, त्याचा आम्ही सर्वजण पाठपुरावा करत असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
बेंगलोर विमानतळावर बांबू पासून भव्य इमारत बनत आहे त्यासाठी व्हियतनाम वरून बांबू मागविला जातो आहे,असा बांबू भविष्यात आपण पिकवू असा विश्वास व्यक्त करून बांबू बरोबर खजूर, ऑलिव ट्री लागवडीबाबतही पडताळणी करतो आहोत. जे नवं ते लातूरला हवं, हे विलासराव देशमुख साहेबांचा मंत्र आपण पुढे घेऊन जाऊ या अशी भावनिक सादही यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिली.
