केंद्रीय अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?
केंद्रीय अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?
नवी दिल्ली, दि.१ फेब्रुवारी :
केंद्रीय अर्थसंकल्पात डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा भर देत आरबीआयचे डिजिटल चलन येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मितीची घोषणा केली आहे पण कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने करदात्यांची पुन्हा एकदा निराश झाली आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल असा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केला आहे.
निर्मला सीतारामन यांनी चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प सादर केला. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षाचा पाया घालणारा ठरेल. देशाच्या ७५ ते १०० वर्षाची ब्लू प्रिंट सादर करत असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. देशातील दुर्बलांना परवडणारी घरं देण्यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०२३ पर्यंत देशात ८० लाख नवीन घरे बांधली जातील. रब्बी हंगाम २०२१-२२ मधील गहू खरेदी आणि खरीप हंगाम २०२१-२२ मधील धानाच्या अंदाजे खरेदीमुळे १६३ लाख शेतकर्यांकडून १२०८ लाख मेट्रिक टन गहू आणि धानाची खरेदी अपेक्षित आहे आणि त्यांच्या एमएसपीसाठी २.३७ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केले जातील. रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल. पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या ५ किमी रुंद कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. खाद्य तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात तेल बियांच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी. मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध होणार. पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे. ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल. पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार. 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावतील. गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिले जाणार असून शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार आहे.
कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ वरून ७ टक्क्यांवर आणला आहे. आयकरचा छापा पडला तर संपूर्ण संपत्ती जप्त होणार आहे. पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांवरील आयातशुल्कात घट करण्यात आली आहे. जीएसटी लागू केल्यापासून जानेवारी २०२२ मध्ये सर्वात जास्त GST वसूल झाला. क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार आहे. कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर केला आहे. प्राप्तिकर परतावा विवरणपत्र भरताना काही चुका झाल्यास दुरुस्त करण्याची पुन्हा संधी मिळणार.
