शाळा ऑनलाईन तर परीक्षा ऑफलाईन का?
शाळा ऑनलाईन तर परीक्षा ऑफलाईन का?
शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन.
मुंबई, दि. ३१ जानेवारी:
दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व उस्मानाबादमध्ये हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले होते. मुंबईत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. नागपुरात बसेसवर दडगफेकही करण्यात आली. अचानक झालेल्या या आंदोलामुळे काही वेळासाठी वातावरण अशांत झाले होते पण पोलिसांनी ते नियंत्रणात आणले.
शाळा ऑनलाईन असताना परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल करत हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी होती. परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेले आहे. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही.
हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावरून विद्यार्थांना आवाहन केले होते त्यानंतर हे विद्यार्थी धारावीत जमले. पोलीस या हिंदुस्थानी भाऊचा शोध घेत आहेत. विद्यार्थ्यांना भडकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत तर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याने सोशल मीडियावर आवाहन करत शिक्षण मंत्री यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करा असे सांगितले होते. परीक्षा रद्द करा, फी माफ करा अशा मागण्या हिंदुस्थानी भाऊ याने केल्या आहेत.
