देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान अबाधित राखण्यासाठी जागरुक रहा !
देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान अबाधित राखण्यासाठी जागरुक रहा !
काँग्रेस मुख्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
मुंबई, दि. २६ जानेवारी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी देशाला संविधान दिले. संविधानाने सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, समानतेचा हक्क दिला. पण भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत. हा धोका लक्षात घेऊन देशाला मोठ्या संघर्ष व बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य व संविधान अबाधित राखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागरुक रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
नाना पटोले म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईतील आपण शिपाई आहोत. परकियांना हाकलून देऊन आपण हे स्वातंत्र्य मिळवले. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्याबरोबर, लोकशाही व्यवस्था दिली, संविधानाने नागरिकांना हक्क दिले. हक्क मागण्याच्या प्रवृत्तीमुळेच आपला देश मागे राहिला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले त्यांचे वक्तव्य म्हणजे नागरिकांचे संवैधानिक अधिकार धोक्यात आणण्याचाच प्रकार आहे. युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा, रोजगार हमीचा कायदा आणून देशातील नागरिकांना सक्षम करण्याचे काम केले. परंतु भाजपा काळात मात्र नागरिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम केले जात आहे. केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारमुळे मागील ७ वर्षात स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. हे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान व्यवस्था अबाधित ठेवणे आपले कर्तव्य असून त्यासाठी सदैव सजग रहा.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पटोले म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारचा आमच्यावर दबाव आहे असे सांगत असतील तर संवैधानिक व्यवस्था धोक्यात आली आहे याचेच हे द्योतक आहे. मागील सात वर्षात देशातील चित्र बदलले आहे. देश धोक्यात येतोय, देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवा. कोरोना काळात काळजी घ्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आपण शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला जर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला तर भाजपला त्याचा त्रास का होतो असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित केला. तर जनतेचे मूळ प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी भाजपा धर्मांधतेचे वातावरण तयार करत आहे. उद्यानाला नाव देण्याचे काम महानगरपालिकेचे आहे. मंत्री अस्लम शेख हे त्या उद्यानाचे नामकरण करायला गेले नाहीत तर त्यांच्या निधीतून या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. त्या उद्यानाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून आहे पण भाजपा विनाकारण त्याला धार्मिक रंग देत आहे. निधीच्या बाबतीत काँग्रेस मंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्यात काहीही गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अलर्ट करण्यात चुकीचे काय? फडणवीस यांच्या काळात काय झालं, धिंगाणाच सुरू होता असेही पटोले म्हणाले.
