‘ग्लोबल टीचर’ डिसले गुरुजींना सरकारीबाबूचा जाच !
‘ग्लोबल टीचर’ डिसले गुरुजींना सरकारीबाबूचा जाच !
सोलापूर, २२ जानेवारी:
सरकारी बाबूंचा त्रास झाला नाही असा एकही सापडणार नाही. सरकारी कार्यालय आणि तिथले अधिकारी हे वेगळेच रसायन आहे. लोकांची कामे विनासायास झाली पाहिजेत पण असा सुखद अनुभव येणे दुरापास्तच आहे. सरकारी बाबूंच्या अडलेतट्टंचा आपल्यातील अनेकांना अनुभव आलेला आहे. हाच अनुभव आता जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ मिळवून डिसले गुरुजींना आला.
सोलापूर जिल्ह्याचा तसेच महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवणारे माढा तालुक्यातील परितेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना बाबूगिरीचा फटका बसला आहे. रणजित डिसले यांनी अमेरिकेत जाऊन पी. एच. डी करण्यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात २१ डिसेंबर रोजी अध्ययन रजेचा अर्ज दिला आहे. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी रजेचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगत तुम्ही अमेरिकेत पीएच. डी करण्यासाठी गेल्यावर शाळेचे काय करणार, असा सवाल केला. तुमच्या उपक्रमामुळे येथील अध्यापनाच्या मूळ कामाचे काय, अशी विचारणा करत एवढी प्रदीर्घ रजा शक्य नाही असे बजावले तसेच तीन वर्षांत डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी आणि परितेवाडी शाळेसाठी काय योगदान दिले. त्यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाचा परितेवाडी जिल्हा परिषद शाळेला किती उपयोग झाला हे तपासावे लागेल, असे बाबूगिरी शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी चालवली.
कागदोपत्री काहीतरी अडचण निर्माण करुन डिसेल गुरुजींची मार्गात खोडा घालण्याचे काम या बाबूंनी केली आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर येताच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेत मुख्याधिकारी यांना निर्देश देत डिसले गुरुजींना परदेशी जाण्यास परवानगी देण्यास सांगितले.
पण खरा प्रश्न असा निर्माण होता की, डिसेल गुरुजींना त्यांनी काय केले, त्यांच्या कर्तृत्वाचा शाळेला काय उपयोग असा प्रश्न विचारणाऱ्या अधिकाऱ्यानी काय दिवे लावले. शिक्षण क्षेत्रातासाठी त्यांनी कोणता पराक्रम केला आहे का. अधिकार आहेत म्हणजे त्याचा कसाही उपयोग करुन नाहक त्रास देणे ही कसली यंत्रणा. डिसले गुरुजी यांच्या काही तांत्रीक त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करुन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे परंतु ते न करता चांगल्या कार्यात खोडा कसा घालायचा हेच काम काही अडेलतट्टू अधिकारी करत असतात आणि याचा डिसले गुरुजी आणखी एक बळी ठरले आहेत.
