पुण्यातील शाळांचा निर्णय पुढील आठवड्यात !
पुण्यातील शाळांचा निर्णय पुढील आठवड्यात !
पुणे, दि. २२ जानेवारी:
कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा २४ तारखेपासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्यात मात्र २४ तारखेपासून शाळा सुरु होणार नाहीत. जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. भीमाशंकर देवस्थानाच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी. लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी.
ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. शनिवार आणि रविवार ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. महापालिका क्षेत्रात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा. औद्योगिक अस्थापनांनी कामगारांना लशीच्या दोन मात्रा देण्याविषयी सूचना देण्यात याव्या.
शहरी भागात वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकांश नागरीक घरीच उपचार घेत असले तरी कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा सज्ज ठेवावी. कोविड रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयानाही कोविड रुग्णांना दाखल करून उपचार सुविधा देण्याच्या सूचना द्याव्यात. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
