खा. अमोल कोल्हेंच्या ‘नथुराम’च्या भूमिकेवरून वाद
खा. अमोल कोल्हेंच्या ‘नथुराम’च्या भूमिकेवरून वाद..
मुंबई, दि. २० जानेवारी:
राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार अमोल कोल्हे हे एका वादात सापडले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका त्यांनी एका चित्रपटात साकारलेली आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे.
नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी टाळायला हवी होती. ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला ती भूमिका कशाला करायची? गांधीजी किंवा नेहरुंची भूमिका करायची. इतकी हिंस्त्रक भूमिका कशाला करायची? ते चूक आहे. ती भूमिका साकारताना त्यांनी ती भूमिका किती छान केली ते पण दाखवावं लागेल. ते कलाकार आहेत हे मान्य आहे. पण ते एका पक्षाचे खासदार देखील आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची आयडोलॉजी घेऊन चालायला हवे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस माजी खासदार हुसैन दलवाई यांनी दिली आहे.
एक कलाकार या नात्याने त्यांनी ही भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या. त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, असे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमोल कोल्हे यावर म्हणाले की, “२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचार धारेशी सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत.
व्यक्ती म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचा मी आदर करतो. चार पाच वर्षापूर्वी केलेला सिनेमा आहे आणि तो बाहेर आल्यानंतरच त्यामध्ये काय आहे हे मला कळणार आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कलाकार आणि राजकीय प्रतिमा या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
