सोमवारपासून पहिली ते बारावी शाळा पुन्हा सुरु!
सोमवारपासून पहिली ते बारावी शाळा पुन्हा सुरु!
मुंबई, दि. २० जानेवारी:
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सोमवारी २४ तारखे पासून पहिली पासून बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रा. गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे. मुलांचे आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. शाळेत जाऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत.
शाळा सुरु करत असताना गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळे शाळा सुरु करत असताना नियमावलीचे पालन केले पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात. पालकांची संमती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी आम्ही घेत आहोत. निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात आम्ही येणाऱ्या काळात निर्णय घेणार आहोत. निवासी शाळा किंवा वसतीगृहात गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. शाळा सुरु करण्यासाठी आम्ही शिक्षणतज्ज्ञ, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागातालील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो.
