चप्पल आणि बाप बदलणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये
चप्पल आणि बाप बदलणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत राजकीय कलगीतुरा..
ठाणे, दि. 16 जानेवारी :
ठाण्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा सुरू आहे. खारेगाव उड्डाणपूलावरून श्रेयवादाचे सुरू झालेले राजकारण संपायचे नाव घेत नाही दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेने वर हल्लाबोल केला आणि त्याला शिवसेनेही लागलीच प्रत्युत्तरही दिले.
दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे योगदान विकास कामांसाठी सर्वश्रुत आहेत. मात्र परांजपे यांच्या निधनानंतर त्यांची चप्पल त्याच्या मुलाला घालायला दिली होती. पण आपल्या पित्याची चप्पल पुत्राच्या पायात बसली नाहीच पण आपल्याच पित्याच्या चप्पलेचा अवमान करून दुसऱ्याची चप्पल डोक्यावर घेणाऱ्या या पुत्राला जनतेने दोनवेळा घरी बसविले याचे भान आता ठेवणे गरजेचे आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी माजी खासदार आनंद परांजपे यांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार आनंद परांजपे यांचा समाचार घेताना खासदार डाॅ. शिंदे म्हणाले की,
कल्याण लोकसभा मतदारसंघात विकासाचं बाळ सात वर्षाचे झाले असले तरी या सात वर्षाच्या बाळाने विकासकामांचा डोंगर मतदारसंघात उभा केला ते जनतेला ज्ञात आहे. एवढेच नव्हे तर सुरु असलेले प्रकल्प हे टाईमलाईन नुसारच पूर्ण होतील तेव्हा या प्रकल्पांच्या उद्घाटनांना गैरहजर न राहता ‘टाईम’ वर उपस्थित राहा असा टोलाही लगावला.
खारेगांव येथील रेल्वे उड्डाणपूल उद्घाटननंतर आघाडीचे बाता करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र श्रेयासाठी खोटं बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे पत्रकार परिषदा घेऊन आरोप करण्याचा सपाटा लावला आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला. परांजपे यांच्या बिनबुडाच्या आरोपांचा शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन खरपूस समाचार घेतला. उड्डाणपुलाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेतल्यामुळे आम्हालाहि पत्रकार परिषद घ्यावी लागली. एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे आम्ही शांत होतो. पण वारंवार पत्रकार परिषदा घेऊन वादाची ठिणगी जर लावणार असाल तर आग भडकणारच आणि कलीयुगातील कालींना पुरण्यासाठी या कलीयुगात नारदाची गरज आहे असे शिवसेनेने स्पष्ट केले.
आनंद परांजपे यांनी बापाची चप्पल मुलाला आली म्हणजे अक्कल येत नाही असे विधान केले या विधानाचा समाचार घेताना शिवसनेने म्हंटले आहे की दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृवाखाली दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी विकास कामे केली. मात्र प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर शिवसनेने जराहि विलंब न लावता परांजपे यांच्या पायातील चप्पल त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांना घालायला दिली. शिवसैनिकांनी आनंद परांजपे यांना खासदार केले मात्र शिवसैनिकांनी झिजवलेलेल्या चप्पलांचा विचार तर सोडाच पण या आनंद परांजपे यांच्या पायात त्यांच्या वडिलांची चप्पल सुद्धा बसली नाही आणि हि चप्पल कशी टिकवावी याची अक्कल न आल्यामुळेच एनवेळी इतर पक्षाची चप्पल आपल्या पायात घालण्यात आणि बाप बदलण्याची वेळ आनंद परांजपे यांच्यावर आली. त्यामुळे चप्पला आणि बाप याच्या उपमा आणि सल्ले देण्याच्या फंदात परांजपे यांनी पडू नये.
पत्रकार परिषदेत माजी खासदार बोलत होते की वेद, पंचांग आणि रविवारचे भविष्य सांगणारा एखादा माणूस बोलत होता हे कोडं सर्वांना पडलं आहे. आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात स्मार्ट सिटी म्हणजे काय, हि व्यवस्था नेमकी कोण पाहते, कोणते सल्लागार मंडळाच्या देखरेखीखाली या स्मार्ट सिटीचे काम चालते याची माहिती परांजपे यांनी आधी घ्यावी. जनतेने दोनवेळा दिल्लीवरून गल्लीत पाठविल्यामुळे दिल्लीतील योजनांचा विसर आणि कार्यपद्धती हे परांजपे बहुधा विसरले असावेत असेही खा. शिंदे म्हणाले.
