नाशिक झेडपी निवडणुकांसाठी आघाडीकरिता प्रयत्न !

0
FB_IMG_1634536741157

नाशिक झेडपी निवडणुकांसाठी आघाडीकरिता प्रयत्न !

नाशिक, दि.15 जानेवारी :
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रस्थानी राहिली असून यंदाच्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करण्यात यावी अशा सूचना जिल्ह्यातील आजी माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना देत आगामी जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगरपालिकांसह नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले .

भुजबळ फार्म कार्यालयात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच निर्णायक स्थितीत राहिला आहे. त्यामुळे यंदाही नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने पक्षीय स्तरावर सन्मानपूर्वक आघाडी करण्यास आपला प्रयत्न असणार आहे. शहर आणि जिल्हाभरात केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून आपण सर्वांनी कामाला सुरुवात करावी. आपापल्या परिसरात कोविडच्या संदर्भात आवश्यक ती मदत करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना सुध्दा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. सदर बैठकीत नाशिक, मालेगाव महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित सदस्यांनी चर्चेत सहभाग घेऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मते मांडली. यावेळी सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *