राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला 8 सुवर्णसह 30 पदक

0
IMG-20220111-WA0036

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला 8 सुवर्णसह 30 पदक.

मुंबई, दि. 12 जानेवारी :
केंद्र शासनामार्फत दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवक-युवतींनी 8 सुवर्ण, 4  रजत, 7 कांस्य आणि 11 उत्तेजनार्थ पदके अशा एकुण 30 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राने पदकसंख्येत देशात दुसरे स्थान पटकावले आहे.

पुरस्कारविजेते तरुण-तरुणी आता शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी पात्र ठरले असून त्यांना आपले कौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करता येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल सर्व युवकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्पर्धेमध्ये 10 सुवर्णपदकांसह एकूण 49 पदके पटकावून ओडीशा राज्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर 8 सुवर्णपदकांसह एकुण 30 पदके पटकावून महाराष्ट्र राज्य द्वीतीय क्रमांकावर आले. याशिवाय केरळ 24 पदके, कर्नाटक 23 पदके, तामिळनाडू 23 पदके, आंध्र प्रदेश 16 पदके, बिहार 13 पदके, हरयाणा, गुजरात, राजस्थान व चंदीगड यांना प्रत्येकी 11 पदके, पंजाब 8 पदके अशा पद्धतीने विविध राज्यांनी कामगिरी केली आहे.

राज्यातून एकुण 60 पेक्षा अधिक स्पर्धक दिल्ली येथे राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी झाले होते. यापुर्वी गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या पश्चिम प्रादेशिक स्पर्धेत 45 पदके पटकावून 55 टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले होते.

मंत्री मलिक म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल. राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविलेल्या तरुणांनी आता जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *