‘तो’ दिवस राज्याच्या शैक्षणिक परंपरेसाठी काळा दिवस!
‘तो’ दिवस राज्याच्या शैक्षणिक परंपरेसाठी काळा दिवस!
राजकीय फायद्यासाठी विद्यापीठ सुधारणा विधेयक..
शिर्डी, दि. ११ जानेवारी:
विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करुन महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठांची गुणवत्ता गुंडाळून टाकण्याचे षडयंत्र रचले आहे. विद्यापीठात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे घोटाळ्यांचे नवे कुरण निर्माण होणार आहे. विधानसभेत हे विधेयक मांडले तो दिवस राज्याच्या शैक्षणिक परंपरेसाठी काळा दिवस ठरला, अशी घणाघाती टीका भाजपाचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले यांनी केली आहे.
विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र पाठवण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. लोणी बुद्रूक पोस्ट कार्यालयात पत्र टाकून विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन केले. त्यानंतर विखे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते.

विखे पाटील म्हणाले की, विद्यापीठांची स्थापना झाल्यापासून कधीही कोणत्याच सरकारने विद्यापीठांच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप केला नाही. त्यामुळेच राज्यातील सर्व विद्यापीठांची गुणवत्ता आणि नावलौकीक टिकून राहिला. महाविकास आघाडी सरकारने आपल्या राजकीय फायद्यासाठी कुलपती आणि कुलगुरुंचे आधिकार कमी करुन, प्रतीकुलपती म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे आधिकार देण्यासाठी आणलेले हे विधेयक म्हणजे केवळ राजकीय हित जोपासण्यासाठी असून कुलगुरु होण्यासाठी मंत्रालयात लॉबींग होईल.
विद्यापीठांमध्ये कंत्राटे मिळवण्यासाठी बाजार भरवण्याचाच हा प्रयत्न आहे. उद्याच्या पिढीच्या उज्वल भविष्यसाठी हे विधेयक कदापीही मंजूर होऊ देणार नाही. हा काळा कायदा तातडीने सरकारने मागे घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.
