RSS विचाराचे सरकार असल्याने अण्णाभाऊ साठेंच्या नावाची एलर्जी !

0
IMG_20210902_214002

RSS विचाराचे सरकार असल्याने अण्णाभाऊ साठेंच्या नावाची एलर्जी !

आंबेडकर फाउंडेशनचे “ते” उत्तर संतापजनक..

मुंबई, दि. 5 जानेवारी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनला अण्णाभाऊ साठे यांचे नाव माहिती नसावे यावरून या फाउंडेशनच्या कार्यक्षमतेचे वास्तव आणि केंद्र सरकारचा वैचारिक पूर्वग्रहदूषितपणा स्पष्ट होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेत असल्याने त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या नावाची एलर्जी असावी, अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.

अण्णाभाऊ साठेंना महापुरुष मानण्यास नकार देऊन केंद्र सरकारने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कोट्यवधी अनुयायांचा अवमान केला आहे, अशी संतप्त भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य जनमानसात आपल्या साहित्याद्वारे पोहोचविणारे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या महामानवांच्या यादीत समाविष्ट केले जावे यासाठी महाविकास आघाडी सरकार पाठपुरावा करेल, असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्यातील पुरोगामी व प्रबोधन परंपरेतील सर्व संत,समाजसुधारक आणि फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सर्व महामानवांची माहिती लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळविले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

माध्यमांनी केंद्र सरकारच्या या दलित शोषित विरोधी मानसिकतेची लक्तरे वेशीवर टांगल्यावर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा समावेश महामानवांच्या यादीत करण्याची घोषणा म्हणजे धूळफेक करण्यासाठी सारवासारव असून ही केंद्राला सुचलेली पश्चातबुद्धी असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी व्यक्त केली आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नसल्याचे आणि ते महापुरुष नसल्याचे’ केंद्र सरकारच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनने माजी आमदार सुधाकर भालेराव यांना लेखी कळविले. त्यानंतर माध्यमातून ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ यांचे नाव महामानवांच्या यादीत करण्याची घोषणा केली. मात्र आठवले यांच्या घोषणेला मोदी सरकार किती महत्व देते? आठवलेंची घोषणा खरी ठरेल का? असे प्रश्न उपस्थित करून डॉ. राऊत यांनी याबाबत शंका व्यक्त केली.

“फाउंडेशनचे उत्तर संतापजनक व अवमानजनक आहे. अण्णाभाऊ साठेंच्या क्रांतिकारी कार्याची उपेक्षा करण्याचा आणि आंबेडकरी चळवळ देशवासियांना कळू नये असा हेतू तर केंद्र सरकारचा यामागे नाही ना, ही शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांचा विचार आपले साहित्य,पोवाडे आणि प्रत्यक्ष कृती यांच्या माध्यमातून जनतेत लोकप्रिय करणारे अण्णाभाऊ साठे यांचे नावही महामानवांच्या यादीत टाकायचे नाही,हा केंद्र सरकारचा दुटप्पीपणा आहे”,असेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *