कोरोनाच्या दोन लसमात्रा न घेणाऱ्यांना ‘नो एन्ट्री ‘ !
कोरोनाच्या दोन लसमात्रा न घेणाऱ्यांना ‘नो एन्ट्री ‘ !
थ्री प्लाय किंवा एन ९५ मास्कचाच वापर करा..
पुणे, दि. 5 जानेवारी :
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात यावे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापना चालकांनी लशीच्या दोन मात्रेशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये.
कोविडपासून बचावासाठी मुखपट्टीचा (मास्क) उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे मुखपट्टी न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने थुंकणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारण्यात यावा आणि या निर्देशाचे कठोरतेने पालन करावे. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा एन ९५ प्रकारच्या मुखपट्टीचा वापर करावा, अन्य प्रकारची मुखपट्टी (मास्क) सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्याचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. १०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ ठिकाणी ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के आला आहे. या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
