मुंबई बँकेवर सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व !
मुंबई बँकेवर सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व !
मुंबई, दि. 4 जानेवारी :
मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवित सर्वच्या सर्व २१ जागांवर दमदारपणे विजयी झाले आहेत. प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व २१ जागांवर विजयी झाले आहेत. यातील १७ जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरीत चार जागांवरही सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना १८ मते तर सुखदेव चौगुले यांना १६ मते मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मते तर कमलाकर नाईक यांना ५९ मते मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना ३३२ मते तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मते मिळाली.
भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल ४ हजार मते मिळाली तर, यलाप्पा कुशाळकर यांना ३५० मते मिळाली. प्रविण दरेकर यांच्या पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्या नेतृत्वावर व सहकार पॅनेलवर विश्वास टाकत २१ पैकी २१ जागा निवडून दिल्या आहेत. त्याबद्दल मी सर्व मुंबईकरांचे, सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सर्व मुंबईकर, सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, सर्व मुंबईकरांनी जाती-धर्माच्या पलीकडे व पक्षाच्या पलीकडे जाऊन मुंबई बँकेच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आमच्या सहकार पॅनेलवर विश्वास दाखवला. येणाऱ्या काळात मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबई बँकेला ताकद, उर्जितावस्था देत महाराष्ट्रात मुंबई बँकेचे मुंबईसह महाराष्ट्रात सर्वोच्च स्थान राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
