निराश्रितांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा क्षण आनंददायी !

0
IMG_20220102_123813

निराश्रितांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा क्षण आनंददायी !

नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप.

नागपूर, दि. 2 जानेवारी :
हातावर कमावणाऱ्यांना हक्काचे घर दिवास्वप्न असते. जगण्याची भ्रांत असणाऱ्या लोकांच्या घरावर छत मिळणे यासारखे समाधान नसते. प्रशासनाच्या मदतीने निराश्रितांच्या घराची स्वप्न पूर्ण होत असल्याचा हा क्षण आनंददायी आहे, असे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले .

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील नझूल, मनपा व नागपूर सुधार प्रन्यासच्या कक्षेत येणाऱ्या झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अधिसूचित झोपडपट्टीतील नझूल जमिनीवरील झोपडपट्टी धारकांना यावेळी प्राथमिक स्वरूपात पट्टे वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जवळपास साडेतीनशे प्रस्तावित प्रकरणांना अधिकृत करण्यात येत आहे. यापैकी काही निवडक प्रातिनिधिक पट्टे धारकांना या कार्यक्रमात पट्टे वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या नवीन कोरोना प्रतिबंधक नियमानुसार केवळ 50 लोकांना या कार्यक्रमासाठी उपस्थिती मर्यादित ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे मोजक्या लोकांना पट्टे वाटप करण्यात आले. नझूल क्षेत्रातील 110, नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत 110 व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील 30 अशा एकूण 250 झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे.

मानकापूर येथील क्रीडा संकुलात या संदर्भातील भव्य आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी लाभार्थी एकत्रित येणार होते. मात्र राज्य शासनाच्या नियमाला अनुसरून रात्री 50 चा नियम निर्धारित करण्यात आल्यामुळे मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. तथापि, लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी दृकश्राव्य पद्धतीने या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी पालकमंत्र्यांनी कामाच्या शोधात शहराकडे आकर्षित होणाऱ्या गरीब जनतेला घराचा मोठा प्रश्न आहे. कसेबसे शहरात कुठे रोजगार मिळाला तर रहावे कुठे? हा प्रश्न राहतो. त्यामुळे हजारो कुटुंब पुढे निवासाचा यक्षप्रश्न उभा आहे. मागील वीस पंचवीस वर्षांपासून शहरात झोपड्यांचा प्रश्न वाढत आहे. बहुतांशी झोपड्या या केंद्र किंवा राज्य शासनाच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर आहेत. शासनाने वर्षांनुवर्षे राहणाऱ्या कुटुंबांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच हा सोहळा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महानगरपालिका सुधार प्रन्यास आणि महसूल विभागाने यासाठी घेतलेला पुढाकार व केलेल्या पाठपुरावा बद्दल कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *