मराठी भाषेची वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित

0
20211231_131755

मराठी भाषेची वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित..

‘साहित्य अकादमी’ विजेत्या मराठी साहित्यिकांचे
उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन.

मुंबई दि. 31 डिसेंबर :
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी नातं सांगणाऱ्या, गावखेड्यातलं जीवन साहित्यातून मांडणाऱ्या, गाव व शहरातल्या बदलत्या संस्कृतीतलं द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या लेखकांना मिळालेला साहित्य अकादमीचा हा पुरस्कार ग्रामीण भागातील युवकांना लिहिण्यासाठी प्रेरीत करेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधिक्षक, साहित्यिक डॉ. किरण गुरव यांना, प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार तर संजय वाघ यांना बालसाहित्य पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ कथासंग्रहास साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार, संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ कादबंरीला बालसाहित्य पुरस्कार, प्रणव सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादबंरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहिर झाल्याने मराठी भाषा, संस्कृती, साहित्यातली वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मराठी साहित्यिकांचा राष्ट्रीय स्तरावर होणारा गौरव हा प्रत्येक मराठी भाषाप्रेमीला सुखावणारा आहे. डॉ. किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण साहित्यिक लिहिलेत होतील. मराठी भाषा अधिक समृद्ध करतील, असा मला विश्वास आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी पुरस्कारविजेत्या साहित्यिकांचं अभिनंदन केलं.

कोंकणी भाषेतील साहित्यासाठीचे पुरस्कारविजेते संजीव वेरेंकार, साहित्य अकादमी वार्षिक पुरस्कार विजेत्या सुमेधा कामत देसाय, बालसाहित्य पुरस्कार विजेत्या श्रद्धा गरड या कोकणी साहित्यिकांसह सर्व पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *