ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

0
DCM 333333

ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

मुंबई, दि. २८ डिसेंबर :

स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसरचाही विकास करण्यात येईल. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिला.

महाराष्ट्र विधानसभा नियम ४७ अन्वये निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक हौतात्म्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन वंदन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचे रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य, छत्रपती संभाजी महाराजांनी केले. महाराष्ट्र धर्माचे, स्वराज्याचे रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांना एकावेळी अनेक शत्रूंचा, अनेक आघाड्यांवर सामना करावा लागला. ज्ञान, गुण आणि चारित्र्याने संपन्न असलेल्या संभाजी महाराजांनी हा सामना मोठ्या धैर्याने केला. संभाजी महाराज स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *