… तर राज्यातील शाळा पुन्हा बंद!
… तर राज्यातील शाळा पुन्हा बंद!
मुंबई, दि. २२ डिसेंबर:
कोरोनामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्यानुसार राज्यातील बहुतांश भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती पूर्वीएवढी नसली तरी ग्रामीण भागात तर शाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शाळा सुरु झाल्या असल्या तरी पुन्हा एकदा नवी चिंता सतावू लागली आहे. सुरु केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या जातील का अशी परिस्थिती निर्माण झाली असून तशा चर्चाही सुरु झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे विधान तर शाळा पुन्हा बंद केल्या जाऊ शकतील असेच आहे.
शालेय शिक्षण मंत्री म्हणाल्या की, ‘ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत’.
देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. देशात एकूण २१३ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे त्यातील ५४ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत.
