ठाकरे सरकारमध्ये लोकशाही नाही तर रोकशाही !
ठाकरे सरकारमध्ये लोकशाही नाही तर रोकशाही !
मुंबई, दि. २१ डिसेंबर :
महाराष्ट्रात अधिवेशन घेण्याची या सरकारची मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही आणि भोगशाही चालू आहे. स्थगिती, खंडणी, वसुली, लूट, भ्रष्टाचार याचे जेवढे प्रकार या सरकारच्या काळात पाहायला मिळत आहेत तेवढे कधीच पाहायला मिळाले नाहीत, असा हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर चढवला.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी बोलू नये, त्यांची तोंडे बंद करण्यासाठी एकेक वर्षासाठी आमदारांना निलंबित करणे राज्याच्या इतिहासात काळिमा फासण्याचे काम सरकारच्या दबावाखाली होत आहे. ज्या घटना घडल्या नाहीत त्यांची कारणे सांगून आमच्या आमदारांना निलंबित केले आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्याचे एवढेच कारण आहे की आपल्या स्वत:च्या आमदारांवर सरकारला विश्वास नाही. सरकार कधीही अडचणीत येऊ शकते असा ठाम विश्वास यांच्या मनात आहे म्हणून मुद्दाम आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सरकारने केला आहे.
राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झालेली असताना नियमबाह्य पद्धतीने अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा घाट घातला जात आहे. १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे हे सांगत होते, तो किती पोकळ आहे हे यातून लक्षात आले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सरकार उघड्यावर पडले. दोन वर्षात इम्पिरिकल डेटा जमा करता आला नाही आणि आता ३ महिन्यांत डेटा गोळा करू म्हणत आहेत. मग दोन वर्ष कुठे झोपा काढत होते? हा डेटा केंद्राकडे नसल्याचे आम्ही सांगत होतो. राजकीयदृष्ट्या मागास असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागितली होती. पण तो डेटा नव्हता. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचे आरक्षण गेले आहे. त्याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
