‘त्या’ पार्टीत महाराष्ट्राचा मंत्री होता हे शेलारांनी सिद्ध करावे!
‘त्या’ पार्टीत महाराष्ट्राचा मंत्री होता हे शेलारांनी सिद्ध करावे!
मुंबईच्या महापौर पेडणेकरांचे आशिष शेलारांना आव्हान.
मुंबई, दि. २० डिसेंबर :
भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना मुंबईच्या महापौर किरोशी पेडणेकर यांनी थेट आव्हान दिले आहे. चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रीही उपस्थित होता का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पडणेकर यांनी ‘त्या’ पार्टीमध्ये कोण होते, ते शेलारांना सिद्ध करावेच लागेल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महापौर पुढे म्हणाल्या की, तुम्ही जी पुडी सोडली आहे त्याचे पुरावे द्या, त्या पार्टीत कोण होते याचा उलगडा करावाच लागेल. दरवेळेला जनतेला फसवण्याची सुपारी घेतली आहे का? माझा सवाल आशिष शेलार यांना आहे की त्यांनी ‘त्या’ पार्टीमध्ये कोण होते ते सिद्ध करावे. बेछूट आरोप करुन लोकांना फसवण्याच्याची तुमची पद्धत लोकांना कळली आहे. तुम्ही आमदार झालात पण जीव मात्र महापालिकेत घुटमळत आहे, तो कशासाठी? त्यामुळे तुम्ही केलेले आरोप सिद्ध करा. तुमच्याकडे पुरावे असतील तर दाखवा. पार्टीत कोण होते याचा पुराव्यासह खुलासा करा, अन्यथा महाराष्ट्राची माफी मागा.
आशिष शेलार आमदार आहेत आणि ते इतक्या बेजबाबदारपणे कसे बोलू शकतात. ज्या ठिकाणी आग लागलेलीच नाही तिथून धूर कसा काढायचा हे भाजपाकडून शिकण्यासारखे आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशी आशिष शेलार यांची पद्धती आहे असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला.
