भाजपा 5 ऑगस्टला दिवाळी साजरी करणार!
राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन.
मुंबई, 3 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी राज्यातील जनतेला व भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ५ ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी मा. मोदीजींच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा.
ते म्हणाले की, मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा.
५ ऑगस्टच्या समारंभाचा सामुहिक उत्सव टाळावा. सामुहिक उत्सव साजरा करणार असू तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सामुहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नकोत असेही चंद्रकांत दादा म्हणाले.
