‘काशी विश्वेश्वर कॉरिडोर’चे लोकार्पण!
‘काशी विश्वेश्वर कॉरिडोर’चे लोकार्पण!
वाराणसी, दि. १३ डिसेंबर:
काशी विश्वेश्वर कॉरिडोरचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांचा उल्लेख केला. या देशाची माती जगापेक्षा वेगळी आहे. याच महान भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर आणि पराक्रमी राजे निर्माण झाले. औरंगजेबासारख्यांचे मनसुबे त्यांनी उधळून लावले. ही आपली शूरांची भूमी आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी कालभैरव मंदिरात जाऊन पूज केली तसेच गंगा नदीत स्नान केले. वाराणसीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काशी विश्वेश्वराची पूजा केली.

काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण करताना पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. काशीत फक्त एकच सरकार आहे. ज्याच्या हाती डमरू आहे, अशा काशी विश्वेश्वराच्या इच्छेशिवाय इथे एकही पान हालत नाही. काशी विश्वनाथ कॉरिडोर होणे ही काशी विश्वेश्वराचीच इच्छा आहे आणि वाराणसीच्या जनतेने ती पूर्ण केली आहे. काशी विश्वेश्वराच्या म्हणजेच महादेवाच्या मर्जीशिवाय इथे कोणी येऊ शकत नाही आणि इथे कोणाची चालत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आक्रमण करणाऱ्यांनी काशीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. संध्याकाळी गंगा आरती करण्यात आली. दोन दिवसाच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री आदित्यनाथ त्यांच्यासोबत असणार आहेत.
