अष्टविनायक देवस्थानच्या रस्त्यांची सुधारणा लवकर होईल !
अष्टविनायक देवस्थानच्या रस्त्यांची सुधारणा लवकर होईल !
अलिबाग, दि.13 डिसेंबर :
महाविकास आघाडीचे शासन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. देवस्थान अष्टविनायक आराखड्याबाबत चर्चा झाली असून अष्टविनायक देवस्थानच्या विकास आराखड्यांतर्गत लवकरच रस्त्यांची सुधारणा होण्याच्या दृष्टीनेही आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे यांनी दिले.
अष्टविनायक क्षेत्रापैकी महड येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरास भेट दिल्या नंतर त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, रस्त्यांची सुधारणा होण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाणार आहे तर देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा व्हायलाच हव्यात. खोपोली-पाली मार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत चौकशी करून या प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून देवस्थान विकास कामांसाठी आवश्यक निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
तमाम भाविकांची श्रद्धा वाढीस लागो आणि महाराष्ट्राची वाटचाल सर्वांगीण विकासाकडे होवो, अशी प्रार्थना श्रीगणराया चरणी आहे, महड देवस्थान विकास कामासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. महड फाटा ते महड देवस्थान अशा मार्गावर पथदिवे हायमास्क साठी रुपये पाच लाखाचा निधीही महड देवस्थान समितीला देण्यात येईल असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
