आपणच आपले समुद किनारे स्वच्छ ठेवूया !

0
IMG-20211211-WA0015

आपणच आपले समुद किनारे स्वच्छ ठेवूया !

अमित ठाकरेंच्या ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’ला महाप्रचंड प्रतिसाद.

मुंबई, दि. 11 डिसेंबर :
गेली २५ वर्षं जे सत्तेत आहेत, ते साधे समुद्र किनारे स्वच्छ करू शकले नाहीत. दुर्दैवाने, असं काही करण्याची इच्छशक्तीच त्यांच्याकडे नाही. म्हणूनच माझं आता लोकांनाच आवाहन आहे की, आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणच आपल्या हातात घेऊया” असं मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’ला भरभरून प्रतिसाद लाभला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनाऱ्यांवर हजारो नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत ‘आपले’ समुद्र किनारे प्लॅस्टिकमुक्त तसंच कचरामुक्त केले.

महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही मोहीम म्हणजे फक्त एका दिवसाचा उपक्रम नाही. आपल्या राज्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी आम्ही लोकसहभागातून पुढची अनेक वर्षं काम करणार आहोत” असंही अमित ठाकरे यांनी सांगितलं.

परदेशातील समुद्र किनारे स्वच्छ, चकाचक असू शकतात, मग आपले समुद्रकिनारे गलिच्छ, बकाल का असतात?” असा सवाल उपस्थित करून अमित ठाकरे यांनी ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’त सहभागी होण्याचं आवाहन सर्वाना केलं होतं. शनिवारी सकाळी ११ वाजता ते स्वतः दादर समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. ‘सावित्री प्रतिष्ठान’ च्या अध्यक्षा सौ. शर्मिला राज ठाकरे यांनीही समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, दादर समुद्र किनाऱ्यावर चार हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यांमध्ये अपंग बांधवांचाही समावेश होता.

ज्या ४० समुद्र किना-यांवर आम्ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत, तिथे स्थानिक नागरिकांशी संवाद साधून ‘समुद्र किनारा समिती’ स्थापन करण्यात आली आहे. आज आम्ही स्थापन केलेल्या ४० ‘समुद्र किनारा समित्या’ असून प्रत्येक समितीत २५ सदस्य आहेत. या समित्याच यापुढे समुद्र किना-यांशी संबंधित आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *