शेतकरी आंदोलन अखेर ३७८ दिवसांनी संपले !
शेतकरी आंदोलन अखेर ३७८ दिवसांनी संपले !
नवी दिल्ली, दि. ९ डिसेंबर:
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले व आता शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात प्रस्ताव दिल्यानंतर ३७८ दिवस चालले हे प्रदिर्घ आंदोलन संपवून घरी परतण्याचा निर्णय संयुक्त शेतकरी संघटनेने घेतला आहे.
मोदी सरकारने कृषी कायदे रद्दे केले असले तरी हमीभावाचा कायदा, वीजबिलाचा मुद्दा, आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेणे व ७०० शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देणे या मागण्याबाबतही मार्ग काढण्याविषयी या प्रस्तावात नमुद केले आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ११ डिसेंबरला पंजाबला रवाना होतील. १५ जानेवारीला पुन्हा शेतकरी नेत्यांची आढावा बैठक होणार आहे.
वर्षभरापासून हे आंदोलन सुरु होते अखेर १९ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करत माफीही मागितली व नंतर हिवाळी अधिवेशनात ते मागेही घेतले. आता शेतकरीही घरी परतत आहेत.
