मुलाच्या निवडणूकीसाठी ऊर्जामंत्र्यांनी ‘महावितरण’ला लावले कामाला !!
मुलाच्या निवडणूकीसाठी ऊर्जामंत्र्यांनी ‘महावितरण’ला लावले कामाला !!
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा आरोप.
मुंबई, दि. ७ डिसेंबर :
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी ‘महावितरण’ची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.
नवी मुंबईत वाशी येथे सोमवार ६ डिसेंबर रोजी महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत पाटील यांनी सादर केली. या कामात मदत करण्यासाठी ‘वरून दबाव’ आहे तसेच या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल, मदत न केल्यास त्याचेही ‘फळ’ मिळेल अशा भाषेत महावितरणचे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते.
या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व संबंधित अधिकाऱ्यांना जाबही विचारला. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजीवांना निवडणुकीत कसे साह्य करावयाचे आहे याची टिपणे आढळून आली. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले.
पाटील यांनी सांगितले की, वाशी येथील घटनेतून महावितरणची यंत्रणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या चिरंजीवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही पाटील यांनी दिला.
