पंतप्रधान कितीवेळा माफी मागणार ?
पंतप्रधान कितीवेळा माफी मागणार ?
नवी दिल्ली, दि. ७ डिसेंबर:
शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित करुन मोदी सरकारला खडे बोल सुनावले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, आंदोलनादरम्यानचे गुन्हे मागे घेत नाही, नोकऱ्या देत नाही, या मोठ्या चुका आहेत. अखेर पंतप्रधान किती वेळा माफी मागणार? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी म्हणाले, कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात जवळपास ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश आणि शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे. पण आंदोलनात किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला यांची आकडेवारी सरकारकडे नाही असे उत्तर कृषी मंत्र्यांनी दिले होते. याची आठवण करून राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण संसदेत ठेवली. पंजाब सरकारने ४०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे. १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देखील दिली. तसेच हरियाणाच्याही ७० शेतकऱ्यांची यादी आहे आणि तुमचे सरकार म्हणते की मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी नाही.
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी करत काँग्रेसने नंतर सभात्याग केला.
शेतकरी आंदोलनाचा मुद्दा राहुल गांधी यांनी सातत्याने लावून धरला, मोदी सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण अखेर सरकारला कृषी कायदे रद्द करावे लागले. आता मयत शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राहुल गांधी आग्रही आहेत..
