गडचिरोलीचा विकास हेच माझे प्राधान्य

0
20211206_143226

गडचिरोलीचा विकास हेच माझे प्राधान्य…

गडचिरोली, दि. 6 डिसेंबर :
गडचिरोलीमधील विकासाला माझे प्राधान्य असून येत्या काळात दुर्गम भागात विविध योजना राबवून रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्धतेसाठी काम करणार आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुविधांची निर्मिती करून आरोग्यसेवा बळकट करण्यात आली आहे. पदभरतीचेही प्रश्न येत्या काळात सोडवणार असल्याचे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथे करण्यात आले होते. लोकार्पण केलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित असून लखमापूर बोरी अंतर्गत येणाऱ्या 16 गावांमधील 17243 लोकसंख्येला त्याचा फायदा होणार आहे. तसेच या केंद्राच्या खाली एकूण 6 उपकेंद्र असणार आहेत. यावेळी पालकमंत्री बोलत होते.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा विकास इतर जिल्ह्याप्रमाणे करण्याकडे शासनाचा दृष्टिकोन असून रोजगार निर्मितीसह आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा बळकट करण्याकडे आमचे लक्ष आहे. गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात गेल्या दीड-दोन वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या कोरोना संसर्ग आला मात्र शासनाने आवश्यक मदत वेळत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्येही या दरम्यान चांगले कार्य झाले आहे. येत्या काळातही सर्व नागरिकांनी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लसीकरणासह संसर्ग रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी यशस्वी करून संभाव्य कोरोनाच्या लाटेलाही आपण दूर ठेवूया असे आवाहन त्यांनी केले.

लखमापूर बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत पाहून त्यांनी सर्व सहभागी प्रशासनाचे व गावातील नागरिकांचे अभिनंदन केले. या इमारतींमुळे आसपासच्या सोळा गावांना व सहा उपकेंद्रांना मदत होणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातून 17 हजार नागरिकांना आरोग्य विषयक लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चामोर्शी तालुक्यात येण्याअगोदर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी वडसा येथे एसआरपीएफ गट क्र.१३ ला आज भेट देऊन जवानांशी संवाद साधला. गडचिरोली सारख्या संवेदनशील भागात आपले कर्तव्य बजावताना ते करत असलेला संघर्ष व त्याग भावनेबद्दल त्यांचे जाहीर कौतुक केले. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *