साहित्य संमेलन म्हटले की वाद ही परंपरा पडत आहे काय ?
साहित्य संमेलन म्हटले की वाद ही परंपरा पडत आहे काय ?
नाशिक, दि. 6 डिसेंबर :
आपल्याला नव्या पिढीतून रोबो घडवायचे नाहीत, माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि ते मातृभाषेतूनच जपलं जाऊ शकतं असा माझा विश्वास आहे. साहित्य रसिकांना माझी विनंती की, त्यांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, इंग्रजी वाघीणीचे दूध असेल पण एतदेशीय भाषांच्या विकसनावर ते विरजनाचं काम करत होतं. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा विडा अनेक राजकीय, समाजसुधारक, सुशिक्षित लोकांनी उचलला. महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, महादेव रानडे, गोखले, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि . दा . सावरकर कितीतरी नावे घ्यावीत ज्यांनी राजकीय अथवा सामाजिक कार्याबरोबरच मराठी साहित्याची सेवा केली. मराठी भाषेच्या संवर्धनाची तळमळ असणाऱ्या सुशिक्षितांमध्ये ज्ञानकोशकार तथा श्रीधर व्यंकटेश केतकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल . छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशाचा घालून दिलेला आदर्श त्यांनी अंगिकारला, केतकरांना नेहमी वाटे की , मराठी माणसाचे बौद्धिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर मराठी भाषेचे स्वामीत्व अबाधित राहिले पाहिजे . देशी भाषेत राज्यकारभार असणारे सरकार खरे सरकार अशी त्यांची भुमीका होती. न्यायालयीन निवाडे देशी भाषेत व्हावे असे ठाम मत त्यावेळी त्यांनी मांडले होते. राज्य कारभारात मराठी आली आहे पण दुर्दैवाने आजही न्यायालयीन निवाडे सामान्य माणसांसाठी दुर्बोध आहेत असे त्यांनी सांगितले.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले पण अध्यापन क्षेत्रात मराठी भाषेचा प्रवास तसा खडतर राहिला. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्ये अस्तित्वात येत असताना भाषिक अस्मितेचा अंगार मुलत होता. भाषावार राज्य निर्मितीनंतर राज्यांतर्गत भाषेची अभिवृद्धी होणे अपेक्षित होते , परंतू तसे म्हणावे त्या वेगाने घडत नव्हते , पदवी परीक्षेला मराठी विषय पहिल्यांदा १९२१ साली आला. मात्र आपणास आश्चर्य वाटेल की मुंबई विद्यापीठात मराठी विभाग स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांनंतर म्हणजे १९६९ -७० मध्ये सुरू झाला. मराठी भाषेच्या संवर्धनात स्व. यशवंतराव चव्हाणांनी मात्र अतिशय कष्ट घेतले. ह्या प्रसंगी त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करणे औचित्याचे आहे . ते स्वतः एक उत्तम लेखक तर होतेच पण साहित्य वाचनात त्यांची आजही कोणी बरोबरी करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी त्यांनी आपल्या काव्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्याग्रह मांडला आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला कोणी नाशिककर व महाराष्ट्रातील नागरिक वाद करू शकत नाही. मात्र काही लोक त्यावर वाद निर्माण करतात याची खंत आहे. कुसुमाग्रजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साहित्य संमेलनाला त्यांचे नाव दिले हे स्वागतार्ह आहे. मराठी साहित्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. मराठी भाषेच्या विकासासाठी तात्यासाहेब यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे सांगत साहित्य संमेलन म्हटले की वाद निर्माण करणं ही परंपरा पडत आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
