अभिजात मराठी मोहिमेला जनचळवळीचे स्वरुप

0
IMG-20211204-WA0091

अभिजात मराठी मोहिमेला जनचळवळीचे स्वरुप.

साहित्य संमेलनातील दालनाला उदंड प्रतिसाद..

नाशिक, दि. 5 डिसेंबर :

नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या अभिजात मराठी दालनाला प्रचंड प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ साहित्यिकांसह, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दालनाला भेट देऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. या निमित्ताने अभिजात मराठीची मोहीमेला जनचळवळीचे स्वरुप आल्याचे दिसून आले.

पानीपतकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, अशोक समेळ, कवी अशोक बागवे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रकाश खांडगे आदी मान्यवर साहित्यिकांनी दालनाला भेट दिली व लघुपट पाहिला. यावेळी पत्रकार प्रकाश आकोलकर, प्रकाश खांडगे, खंडूराज गायकवाड, जतीन देसाई, श्रीकांत बोजेवार यांच्यासहमाहिती व जनस्ंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, राज्य कर उपायुक्त जितेंद्र पाटील, कवियत्रि सारिका पाटील यांचाही समावेश होता.
या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने अभिजात मराठीची महती दर्शविणाऱ्या ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ या लघुपटाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. शाळा महाविद्यालयांतील मुलां-मुलींना रांगा लावून लघुपट पाहिला. नागरिकांच्या गर्दी पाहून रात्री उशिरापर्यंत लघुपट दाखवण्यात आला. दोन दिवसांत ५० हून अधिक खेळ झाले.

अभिजात मराठीची महती सांगणाऱ्या दालनाला देखील मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रपती यांना पाठवयाच्या पत्रांवर सुमारे १० हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या.

एकूणच मराठी साहित्य संमेलनात राज्य शासनाच्या भाषा विभागाने अभिजात मराठीसाठी घेतलेल्या पुढाकाराला नागरिकांनी उचलून धरल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *