‘त्या’ पाच केसेस एनसीबीकडे कशासाठी वर्ग करायच्या?
‘त्या’ पाच केसेस एनसीबीकडे कशासाठी वर्ग करायच्या?
मुंबई दि. ३ डिसेंबर
एनसीबी महासंचालकांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवले असून महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडील पाच केसेस एनसीबीकडे वर्ग करव्यात व त्याला केंद्रीय गृहमंत्रालायचे आदेशही आहेत अशी माहिती मिळत आहे. यावर मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी व केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून एनसीबीचे झोनल युनिट महाराष्ट्रात खोट्या केसेस करुन खंडणी उकळण्याचा धंदा करत असल्याचे सिध्द झाले असतानाच टॉप पाच केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते हे का करण्यात येत आहे याचं उत्तर केंद्र सरकारने द्यावे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडील टॉप पाच केसेस एनसीबीकडे देण्यात याव्यात असे पत्र महाराष्ट्राच्या डीजींना एनसीबीच्या डीजीने दिले असल्याचे समोर आल्यावर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर हल्लाबोल केला.
टॉप – ५ केसेसचा निकष दोन ग्रॅम…चार ग्रॅम…तीन टन की जास्त प्रसिद्धी मिळालेल्या केसेस असणार आहे? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्य सरकार आपल्या युनिटच्या माध्यमातून कारवाई करते. जेवढं काम एनसीबीला करता येत नाही त्याच्या कितीतरी पटीने राज्यसरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने काम केले आहे. तुमचं युनिट आहे तर काम करा. काम करत नसेल तर एनसीबीचे युनिट बंद करा असेही नवाब मलिक म्हणाले.
राज्यसरकारचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न केसेस ट्रान्स्फर करुन केला जातोय की एनसीबीमध्ये खंडणी उकळण्याचा धंदा सुरू होता आणि आता टॉप – ५ केसेसच्या माध्यमातून आणखी खंडणी उकळण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा… तुमची संस्था खरंच काम करतेय तर त्या २६ बोगस केसेसची चौकशी कधी होणार? निरपराध लोकांना फसवून अटक केली त्यांना कधी सोडणार, याचे उत्तर द्या अशी प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.
