गुंतवणूक पळवण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत
गुंतवणूक पळवण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत:
मुंबई, दि. २ डिसेंबर:
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व्हायब्रंट गुजरातसाठी गुंतवणूक घेऊन जाण्यासाठी मुंबईत उद्योजकांना भेटत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातला महाराष्ट्राचे उद्योग घेऊन जाण्याची प्रक्रिया जोरात सुरू केली, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत म्हणाले.
यासंदर्भात सावंत म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना महाराष्ट्रातील उद्योग व महत्वाची आर्थिक केंद्रे गुजरातला हलवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेले प्रयत्न आजही सुरुच आहे. मुंबईच्या हक्काचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेल्याने यावर्षी देशात सगळ्यात जास्त परकीय थेट गुंतवणूक गुजरातला गेली जी महाराष्ट्रात आली असती. निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे की आर्थिक प्रवाहाचे मुख्य प्रवेशद्वार हे ‘गिफ्टसिटी’ असेल यातून भाजपाचा उद्देश स्पष्ट होतो. मुंबईचा देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा काढून घेण्याचा हा डाव आहे, तो महाराष्ट्राने हाणून पाडला पाहिजे.
