नव्या विषाणूला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व करा

0
IMG_20211120_084256

नव्या विषाणूला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व करा..

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा..

मुंबई, दि 28 नोव्हेंबर :
ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील. लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले..यासंदर्भात आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. “कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.

नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे.

परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *