ठाकरे सरकारमुळे शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ

0
shelar

ठाकरे सरकारमुळे शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ

ठाणे, दि. २५ नोव्हेंबर:

कोरोना आपत्तीच्या काळात राज्यातील ठाकरे सरकारमुळे शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला असून महाविकास आघाडी सरकार नापास झाले आहे. तर विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सैरभैर झाले आहेत अशी टीका राज्याचे माजी शिक्षण मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी केली.

ठाणे शहर भाजपा,शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ आणि आदर्श विकास मंडळातर्फे गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत आमदार आशिष शेलार बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाने शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालकांच्या पातळीवर मानसिकतेपासून व्यावहारीक स्तरावरील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू होण्याची चर्चा आहे. वाढीव फी, शिक्षक समायोजन, अकरावी प्रवेश आदी प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. केवळ मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जात असून, महाविकास आघाडी सरकार नापास झालेले आहे. सर्व शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला असून, सर्वच घटक सैरभैर झाले आहेत.

विद्यापीठाच्या कामांच्या निविदा मंत्री ठरवीत आहेत. विद्यापीठाने सार्वभौमत्व गमावले आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची आशा आहे. नवे शैक्षणिक धोरण सर्वांनी समजावून घेऊन देशाच्या पुनर्निमितीत योगदान द्यावे, असे आवाहन आमदार शेलार यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *