सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज
सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज..
मुंबई, दि. 12 नोव्हेंबर:
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा अनुभव आपण घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ करणाऱ्या व्यक्तिंच्या तैलचित्राचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे मुल्यमापन केल्यास ग्रामीण जनजीवनातील घडलेले सामाजिक आणि आर्थिक बदल यातून सहकारातील दृष्टीकोन लक्षात येईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले की,देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्रात 22 ते 24 टक्के, सेवाक्षेत्रात 25 ते 54 टक्के आणि कृषी क्षेत्रात 8 ते 12 टक्केच योगदान राज्यांचे आहे. कृषी क्षेत्रातील योगदान वाढण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात गरिबी, भूकबळी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. त्या जनतेला आर्थिक सक्षम, समृद्ध करण्याकरिता सहकाराचा विचार देशाला मिळाला. देशात 115 जिल्ह्यांचा विकासदर कमी असून त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा आहे. येथील दरडोई उत्पन्न, विकास दर आणि कृषी विकास दर नगण्य असल्यामुळे देशाच्या विकासदराचा उच्चांक गाठण्यात अडचणी येत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणि परिवर्तन घडवून आणणे हेच सहकार चळवळीचे यश मानले जाईल.
सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज आहे. वैशिष्ट्ये जोपासून काळानुरुप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी उपलब्ध ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्र आणि देशाचे रुप पालटेल.
