राज्य सहकारी बँक सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्तीकेंद्र

0
IMG_20211112_120959

राज्य सहकारी बँक सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्तीकेंद्र.

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅंकेचा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा..

 

मुंबई, दि. 12 नोव्हेंबर :
राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी पवार बोलत होते.

खासदार पवार म्हणाले, राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा 11 दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे. वैकुंठभाई मेहता, विठठ्लदास ठाकरसी, धनंजय गाडगीळ हे बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत. या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत. मधल्या काळात बँकेची परिस्थिती पाहता सहकार क्षेत्राला चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले. मात्र आता राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. या तैलचित्रांसोबतच त्यांच्या योगदानाचे टिपणही आवश्यक आहे. बँकेची ही उत्तम वाटचाल पाहता लोकांच्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *