प्राध्यापक व प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा
प्राध्यापक व प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा..
प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता
मुंबई, दि. 11 नोव्हेंबर :
मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित काॅलेजमधील 2088 सहाय्यक प्राध्यापक व 370 प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हि माहिती दिली.
उदय सामंत म्हणाले, उच्च शिक्षण विभागांतर्गत प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर पदांपैकी राज्याच्या उच्चस्तरीय सचिव समितीने एकूण 4738 पदांना मान्यता दिली होती. त्यापैकी १६७४ पदे आजपर्यंत भरण्यात आली. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे दिड ते दोन वर्षापासून भरतीवर राज्य शासनाने निर्बंध घातले होते. आजपर्यंतच्या ३७० प्राचार्यांची १०० टक्के रिक्त पदे भरण्यास २३ मार्च २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. तसेच त्याबाबतची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. आता प्राचार्याची रिक्त होणारी पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर २०२० च्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे विभागाने सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. परंतु २०८८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असून यशस्वी उमेदवारांची नियुक्ती सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
