अंडरवर्ल्डच्या रियाज भाटीशी फडणवीसांचे संबंध !!

0
20211101_133115

अंडरवर्ल्डच्या रियाज भाटीशी फडणवीसांचे संबंध !!

नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप.

मुंबई, दि. 10 नोव्हेंबर:
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली.
अंडरवर्ल्डच्या रियाज भाटी याच्याशी फडणवीस यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप करून रियाज भाटी कोण आहे, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे असे आव्हान त्यांनी दिले.

नवाब मलिक म्हणाले की, २९ ऑक्टोबर रोजी सहारा विमानतळावर रियाज भाटी बोगस पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला. ज्याचे दाऊद इब्राहीम गँगसोबत संबंध आहेत. त्यावेळी संपूर्ण शहराला माहीत होते रियाज भाटी कोण आहे? डबल पासपोर्ट प्रकरणात अटक होते आणि तो दोन दिवसात सुटतो, यामागे काय खेळ आहे.
रियाज भाटी भाजपच्या कार्यक्रमात सतत का दिसत होता. देवेंद्रजी तुमच्यासोबत डिनर टेबलवर तो काय करत होता? देशाच्या पंतप्रधानांवर आरोप लावत नाही. परंतु पंतप्रधान मोदी जेव्हा मुंबईत आले होते, त्यावेळी रियाज भाटीने त्यांच्यासोबत फोटो काढले होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कुणाला घ्यायचे, कुणाला पास द्यायचा, याचे पुर्ण स्कॅनिंग केले जाते. मात्र कोणत्याही चौकशी शिवाय रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत पोहोचला कसा? याचे काय कारण होते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात सर्व गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवण्यात आले. बोगस नोटांचे रॅकेट तुम्ही चालवता. रियाज भाटीच्या माध्यमातून वसूली केली जाते. ठाण्यात बसवून संपुर्ण महाराष्ट्रातून वसूली केली. विदेशातून कुख्यात गुंड कॉल करून वसुली करत होते. हा सगळा खेळ देवेंद्र तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सुरु होता असा थेट हल्लाही नवाब मलिक यांनी केला.

रियाज भाटी हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत का फिरतो? दोन पासपोर्टसोबत अंडरवर्ल्डचा माणूस सापडत असेल तर त्याला दोन दिवसात कसे सोडले जाते? पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्याचे व्हीआयपी पास कसे बनवले जातात. बोगस नोटांचे रॅकेट उघड होते, परंतु ते दाबले जाते. पैसे कुठून आले, कुठे जात होते. याची साधी चौकशी का केली नाही? मुन्ना यादव हा कुख्यात गुंड नाही का? याचे उत्तर देवेंद्रजी यांनी द्यावे. सांगावे की मुन्ना यादव गुन्हेगार नाही नवाब मलिक खोटं बोलत आहे. रियाज भाटी सध्या फरार आहे. मुन्ना यादववर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बोगस नोटांचे प्रकरण डीआयआरकडे आहे. ज्या केंद्रीय यंत्रणा चौकशा करतात, त्यांनी याकडे लक्ष द्यावे. बोगस नोटांचे रॅकेटचे पाकिस्तान कनेक्शन कसे आहे, हेही पाहिले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

रियाज भाटीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या नेत्यांसोबत काही फोटो आहेत. रियाज भाटी प्रकरणावरुन काय खुलासा होतोय याची वाट बघतोय. रियाज भाटी कुणासोबत फोटो काढतोय, याला काही अर्थ नाही. प्रश्न हा आहे की, दोन पासपोर्टसोबत जर आरोपी पकडला जातो. तर दोन दिवसात कसा सुटतो. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्याला व्हिआयपी पास कसा मिळतो. फोटो कुणाच्या लग्नात काढला, याबद्दल मी बोलत नाही. कुठल्या मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत फोटो आहेत. मा माझा आरोप नाही. दोन पासपोर्टसहीत कुख्यात गुंड पकडला जातो. दोन दिवसात कसा सुटतो. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण त्याला होते असा हल्लाबोलही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

मुन्ना यादव शासकीय समितीवर अध्यक्ष होता की नाही?हाजी अराफत शेख चेअरमन होता की नाही? हैदर आजम मौलाना आझाद महामंडळाचा अध्यक्ष होता की नाही? अशा पदावर येण्याअगोदर पोलिसांकडून रिपोर्ट मागवण्यात येतो मग यांचे रिपोर्ट पोलिसांनी दिले की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत नवाब मलिक यांनी या सर्वांना बक्षिसी देवेंद्र फडणवीस यांनी देण्याचा प्रयत्न केला असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *