राहिबाई पोपेरे, पोपटराव पवारांसह १० मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

0
20211109_104159

राहिबाई पोपेरे, पोपटराव पवारांसह १० मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान.

आनंद महिंद्रा, कंगणा, एकता, करण, सुरेश वाडकर यांना पद्म पुरस्कार.

नवी दिल्ली 09 नोव्हेंबर :
देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्म पुरस्काराने
महाराष्ट्रातील 10 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये बीजमाता राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार, सरिता जोशी, कंगणा राणावत, अदनान सामी, सुरेश वाडकर, एकता कपूर, करण जोहर, डॉ. रमण गंगाखेडकर यांना पद्मश्री तर उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण देऊन सन्मानित करण्यात आले.

सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे वितरण करण्यात आले. या पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

दरवर्षी प्रजासत्त्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आज सकाळी वर्ष 2020 च्या काही पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सकाळी पार पडलेल्या समारोहात 4 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वर्ष 2020 च्या उर्वरित पद्म पुरस्काराचे वितरण सोमवारी सायंकाळी करण्यात आले.यामध्ये एकूण 6 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महिंद्रा हे महिंद्रा समुहाचे चेयरमन आहेत. जगभरातील 100 देशांमध्ये त्यांचे उद्योगसमूह आहेत.

डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गंगाखेडकर हे वरिष्ठ विषाणूशास्त्रज्ञ आहेत. ते इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल ऍण्ड रिसर्च(ICMR) या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणुन काम केलेले आहे.
सरिता जोशी यांना हिंदी, मराठी, गुजरातीमध्ये अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करून गौरविण्यात आले. गेल्या 7 दशकात त्यांनी नाटक, दूरचित्रवाणी आणि सिनेजगतात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. कंगना राणावत यांना हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिनेक्षेत्रातील गायनासाठी अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या 5 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी 3 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने दुस-या टप्प्यात सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुरेश वाडकर यांना त्यांच्या अविट आवाजाने मराठी, हिंदीसह अन्य भाषेतील गायनासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी एकता कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरचित्रवाणी तसेच चित्रपट सृष्टीतील वैविध्यपूर्ण मालिका तसेच चित्रपट निर्माता म्हणून एकता कपूर यांची स्वतंत्र ओळख आहे. करण जोहर यांनाही कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी सिने जगतात त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित तसेच निर्देशित केलेल आहेत.

पोपटराव पवार यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी पद्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी गौरिवण्यात आले. वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 16 मान्यवरांना पद्म  भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *