वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात कमतरता राहू देणार नाही
वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात कमतरता राहू देणार नाही..
पंढरपूर, दि. 8 नोव्हेंबर:
पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
पालखी महामार्ग तसेच महाराष्ट्रातून जाणारे रस्ते निर्मितीत महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक पाऊल केंद्रासोबत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून पंढरपूरकडे म्हणजेच भक्तिमार्गाकडे जाणारे रस्ते चांगलेच असले पाहिजेत असे सांगून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विठूमाऊलीचा आशीर्वाद असेल. वारकरी संप्रदायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारीची परंपरा जपलेली आहे. त्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात राज्य शासनाचाही पुढाकार असेल असे त्यांनी स्पष्ट केले. वाखरी येथे वारकऱ्याकडून रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हेही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 13 महामार्ग प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे कळ दाबून करण्यात आले. तत्पूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाच्या प्रतिकृतीची पाहणी करून याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर या महामार्गाच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा यांच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे प्रमुख श्री योगेश देसाई व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे प्रमुख श्री मोरे यांचा सत्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
या 13 महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास खासदार सर्वश्री जय सिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर , आमदार सर्वश्री प्रशांत परिचारक, बबनदादा शिंदे, चंद्रकांत पाटील, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवर तसेच संत मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
