पालखी मार्गामुळे तीर्थक्षेत्र पर्यटन वाढून रोजगार निर्माण होतील
पालखी मार्गामुळे तीर्थक्षेत्र पर्यटन वाढून रोजगार निर्माण होतील.
11 हजार कोटींच्या पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
पंढरपूर, दि. 8 नोव्हेंबर:
महाराष्ट्राच्या वारी परंपरेला चालना देण्यासाठी 11 हजार कोटी रुपये किंमतीच्या पालखी मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांच्या सोयीसाठी दोन पदरी रस्त्यांचे चार पदरी रुंदीकरण आणि स्वतंत्र पालखी मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे तीर्थक्षेत्राचे पर्यटन वाढेल तसेच स्थानिक लोकांसाठी नवीन उद्योग व रोजगार निर्माण होतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
पालखी मार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी गडकरी बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले की, आजच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १,१८६ कोटी रुपये किंमतीचे पंढरपूरला जोडणारे २२३ किमी लांबीचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आहेत. हे महामार्ग पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील बागायत क्षेत्रातील साखर कारखान्यांना सेवा देतील आणि नाशवंत कृषी साहित्याच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी आणि पवित्र क्षेत्रे अनेकविध सुविधांनी संपन्न व समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
पंढरपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाचा आणि पर्वणीचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे महत्त्वाकांक्षी प्रकल्प संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या ८ प्रकल्पांच्या भूमिपूजनासह इतर ५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर मंत्री, आमदार-खासदार, अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा महाराष्ट्रातील तीर्थ क्षेत्रांच्या विकासाची नांदी आहे असेही गडकरी म्हणाले .
