३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा

0
IMG_20210630_082953

३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा..

मुंबई, दि. ३ नोव्हेंबर :
विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दूरदृश्यप्रणालीव्दारे जालना येथून सहभागी झाले.

कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. आपापल्या जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी टेस्टींगचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा.

कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *